कापड दुकानात ब्रँडचे स्टिकर लावून हलक्या प्रतीच्या कापडाची विक्री करणाऱ्या कापड दुकानावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली अहमदनगर शहरातील कापड बाजारातील शिंगी एन्टरप्राईजेस या कापड दुकानात ब्रँडचे स्टिकर लावून हलक्या प्रतीच्या कापडाची विक्री करण्यात येत होती. कोतवाली पोलिसांनी या कापड दुकानावर कारवाई केली असून दुकान मालक अमोल धोंडीराम शिंगी (वय 46 रा. खिस्तगल्ली, नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज गणपत पई (रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
*कंपनीकडून तपासणी* :कापड बाजारात शिंगी यांचे कपड्याचे दुकान आहे. हलक्या प्रतीच्या कापड्यावर ब्रँडचे स्टिकर लावून विक्री करण्यात येत होती. नियमित तपासणी दरम्यान दुकानदाराची ही बनावटगिरी संबंधित कंपनीचे संचालक पई यांच्या निर्दशनास आली. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
*पोलिसांचा छापा* :पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा टाकून दुकानदार शिंगी याला ताब्यात घेतले. शिंगी हा अनेक वर्षापासून कापड बाजारात कापड विक्रीचा व्यवसाय करत आहे. हलक्या प्रतीच्या कापडावर कंपनीचे स्टिकर लावून उच्च दरात त्याची विक्री करण्यात येत असे.
*गुन्हा दाखल* :याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ब्रँड लावलेले हलक्या दर्जाचे कापड जप्त करण्यात आले आहे. ऐन दिवाळीत कापड दुकानदाराची अशी बनावटगिरी समोर आल्याने ग्राहकांना कपडे खरेदी करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. शिंगी दुकानदाराने किती ग्राहकांची फसवणूक केली, याचा तपास पोलिस करत आहे.