Milk Price Hike : आधी पेट्रोल, डिझेलनंतर गॅस या सगळ्याच गोष्टी महाग होत असताना पुणेकरांना आणखी एक महागाईचा फटका बसला आहे. या सगळ्याबरोबरच आता दूध देखील महाग झाले आहे. महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या खरेदीत तीन रुपये तर विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यभर गाईच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर प्रत्येकी तीन आणि दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघांकडून घेण्यात आला आहे.
ग्राहकांना प्रति लिटर दूधामागे आता दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून जे दूध संघ दूध खरेदी करतात त्या शेतकऱ्यांना तीन रुपये प्रतिलिटर वाढवून देण्यात येणार असल्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयामुळे आता गाईच्या दुधाचा खरेदीदर प्रतिलिटर 33 रुपये तर, पिशवीबंद दुधाचा किरकोळ विक्री दर प्रतिलिटर 52 रुपये असणार आहे. या दूध दरवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी १५ मार्चपासून करण्यात आली आहे
महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज इत्यादी सहकारी व खासगी दूधव्यावसायिकांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते. दूध पावडर व लोणी यांचे वाढलेले दर त्यामुळे दूधाची वाढती मागणी व कमी उत्पादनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या वाढत्या किंमतीमुळे दरवाढ करण्यात आली आहे अशी माहिती कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालक विवेक क्षीरसागर यांनी दिली.