अहमदनगर – अहमदनगर अँटी करप्शन ब्युरोने कर्जत मधील भूमी अभिलेख कार्यालयात काम करणाऱ्या दोन लोकसेवकांना पंचवीस हजार रुपयाची मागणी करून तडजोडी अंती वीस हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. सुनिल झिप्रू नागरे (वय ४८, मुख्यालय सहायक, वर्ग- ३, कर्जत) आणि कमलाकर वसंत पवार (वय ५२,भूकरमापक, वर्ग-३,कर्जत) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही लोकसेवक आरोपींचे नाव आहे.
तक्रारदार यांची पत्नी व इतर दोन यांची माहिजळगाव शिवारात असलेल्या जमिनीची भुमी अभिलेख कार्यालय, कर्जत यांचेकडून मोजणी करुन घेतली होती. मोजणी नुसार तिन्ही खातेदार यांचे पोट हिस्से करुन हद्दीच्या खुणा दर्शविने करिता दोन्ही आरोपी लोकसेवक यांनी २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारीवरून ०२ मार्च रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये दोन्ही आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचे कडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती २० हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.
त्यावरून आज ०३ मार्च रोजी भूमी अभिलेख कार्यालय कर्जत येथे कारवाई दरम्यान यातील आरोपी लोकसेवक सुनील झिप्रू नागरे याने पंचासमक्ष तक्रारदार यांचे कडुन २० हजार लाचेची रक्कम स्विकारली असता दोन्ही आरोपी लोकसेवक यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस स्टेशन कर्जत येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे











