बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना मातृशोक : रेखाताई क्षीरसागर यांचे निधन
बीड : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व बीड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) माजी आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या आई रेखाताई रविंद्र क्षीरसागर (Rekhatai Kshirsagar) (वय ६५) यांचे बुधवारी (ता. २० एप्रिल) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ऱ्हदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. त्यांना रात्री अचानक ऱ्हदयविकाराचा तिव्र धक्का बसल्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली होती.जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली. यानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांचे चाहते आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. रेखाताई क्षीरसागर या धार्मिक वृत्तीच्या होत्या. अध्यात्म आणि योगाच्या प्रसारासाठी त्यांनी जिल्हाभर दौरे केले. नवगण राजूरी या त्यांच्या गावचे सरपंचपदही त्यांनी अनेक वर्षे भूषविले. मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काकू – नाना विकास आघाडीकडून त्या बहिरवाडी जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या होत्या.त्यांच्यावर गुरुवारी (ता. २१ एप्रिल) नवगण राजूरी येथील त्यांच्या खालचा मळा या शेतात अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पती माजी सभापती व गजानन कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, मुले आमदार संदीप क्षीरसागर, माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्यासह सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या त्या भावजय होत.










