मुंबई – आयपीयल 2022 (IPL 2022) साठी पुढच्या महिन्यात होणाऱ्या मेगा लीलावापूर्वी यावेळी आयपीयलमध्ये सहभागी होणाऱ्या दोन्ही नवीन संघांनी आपल्या तीन-तीन खेळाडूंची निवड केली आहे. अहमदाबादने हार्दिक पांड्या, रशीद खान आणि शुभमन गिल यांची निवड केली आहे. तर आता लखनऊने देखील आपल्या तीन खेळाडूंची निवड केली आहे.
केएल राहुलला लखनऊने आपल्या संघात सामील केले आहे. त्याला लखनऊ संघाचा कर्णधारही करण्यात येणार आहे. याशिवाय, लखनऊ फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि भारताचा अनकॅप्ड लेग-स्पिनर रवी बिश्नोई याचा देखील संघात समावेश केला आहे. लखनऊ राहुलला 15 कोटी, स्टोइनिसला 11 कोटी आणि बिश्नोईला 4 कोटी देणार आहे. याच बरोबर फ्रँचायझी आता 60 कोटी रुपयांसह मेगा लिलावात उतरणार आहे.
राहुलने आपली जुनी फ्रेंचायझी पंजाब किंग्जला सोडण्याबाबत आधीच कळवले होते. त्यामुळे पंजाबने त्याला कायम ठेवले नाही. राहुल गेल्या दोन मोसमात पंजाबचा कर्णधार होता. तर 2020 मध्ये पंजाबने रवीला दोन कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने 14 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहे. तर 2021 च्या आयपीएलमध्ये रवीने 9 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत.
मार्कस स्टॉइनिससाठी लखनऊ ही आयपीएलची चौथी फ्रँचायझी असेल. त्याने 2015 मध्ये दिल्ली कॅपिटल्समधून त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तो पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूनही खेळला. 2020 मध्ये दिल्लीने त्याला 4.8 कोटी रुपयांना परत विकत घेतले होते. दिल्लीकडून खेळलेल्या 27 सामन्यांमध्ये 32 वर्षीय स्टॉइनिसने 142.71 च्या स्ट्राइक रेटने 441 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 15 विकेट्सही घेतल्या आहेत.