पुणे – मुस्लिम मुलींना कर्नाटक मधील शाळा तसेच महाविद्यालयात हिजाब घालून प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर हा वाद चांगलं चिघळला आहे. आता या प्रकरणात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या हिजाबच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
हिजाबच्या वादावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, समाजात आणखी फूट पडेल अशा घटना टाळायला हव्यात. याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, हे दुर्दैवी आहे. भारतीय संस्कृती आणि संविधान आपल्याला जातीय आणि धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडायला शिकवत नाही. विशेष म्हणजे कर्नाटकात सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादावरून राजकारण तापले आहे.
दुर्दैवाने काही लोक अशा विषयांमधून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आज जग पुढे जात आहे. प्रगत देश आणखी प्रगत होत आहेत. आपल्या देशात तरुणांची एवढी मोठी फळी असताना तरुणाईचा वापर विकासासाठी कसा करता येईल याचा विचार करायला हवा, असे अजित पवार म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले की अशावेळी एखादी व्हिडीओ क्लिप व्हायरल केली जाते, मग त्यावरुन कुणीतरी ट्विट करतं, त्यावर काऊंटर ट्विट पडतात आणि मग त्यातून निष्कारण विषयाला महत्त्व दिले जाते. याबाबत सर्वांनी समंजस भूमिका घेऊन संयम ठेवला पाहिजे.
महाराष्ट्रापासून पश्चिम बंगाल पर्यंत हिजाब घालू देण्याच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मालेगावसह पुण्यात हिजाबच्या समर्थनात आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दुसऱ्या राज्यातील घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन न करणे योग्य नसल्याचे म्हटले होते.