ॲमेझॉनची 28 लाखांची फसवणूक ; सांगलीत महिलेने मारला डल्ला:

ॲमेझॉनची 28 लाखांची फसवणूक ; सांगलीत महिलेने मारला डल्ला

सांगली : ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून घेतलेल्या वस्तू घरपोच करणाऱ्‍या ॲमेझॉन कंपनीची (Amazon)तब्बल २८ लाखाची फसवणुक झाली. वस्तू घरपोच करणाऱ्‍यांनी आवश्यकतेपेक्षा जादाची रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग करुन ती परस्पर हडपली आहे. याप्रकरणी संशयीत भाग्यश्री नागनाथ पावले (रा.डी मार्टच्या मागे विठ्ठलनगर) हिच्या विरोधात संजयनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूंचे वितरण करणाऱ्‍या एनटेक्स ट्रान्सपोर्ट कंपनीचे बालाजीनगरमध्ये कार्यालय आहे. त्या कार्यालयातील केतन कल्याणराव वाघ (रा. शंभरफुटी, हरिप्रियानगर) यांनी संशयीत भाग्यश्री पावले हिच्या विरोधात फिर्याद दिली. नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधित १११ ग्राहकांच्या खात्यावर आवश्यकतेपेक्षा जास्त रक्कम वर्ग करुन कंपनीची २८ लाख १० हजार ३०० रुपयांची फसवणुक केल्याचे वाघ यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.ऑनलाईन खरेदी केलेली वस्तू संबधित ग्राहकाच्या घरी पोहच केले जाते. त्यावेळी संबधित वस्तूची किंमत ग्राहकाकडून वसूल केली जाते. त्यावेळी ग्राहकाला परत देण्यासाठी सुटे पैसे नसतील तर कंपनीच्या खात्यावरुन ऑनलाईन पध्दतीने सुटे पैसे ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केले जातात. नेमका याच संधीचा फायदा घेत संशयीतांनी जादाची रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग करुन ती पुन्हा संबधित ग्राहकाकडून रोखीने घेतली आहे. असा प्रकार १११ ग्राहकांच्याबाबतीत घडला आहे. वर्षभरातून एकदा होणाऱ्‍या लेखापरिक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. त्यानंतर प्राथमिक चौकशी करुन ट्रान्सपोर्ट कंपनीने संशयीत भाग्यश्री पावले हिच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास संजयनगर पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here