नाशिक – नाशिक मधील एका रिसॉर्टमध्ये छापा टाकत रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्टी तसेच देहविक्रीचा प्रकार नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलीसांनी केलेल्या या मोठया कारवाईत 20 तरुणीसह 75 जणांना अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एका नामांकित कंपनीकडून तालुक्यातील त्रिंगलवाडी हद्दीतील पारदेवी येथील माउंटन शॅडो रिसॉर्टमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या पार्टीची पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलीस यांच्या पथकाने या रेस्टॉरंटवर मध्यरात्री कारवाई केली.
यावेळी पोलिसांना पार्टीतील अनेक जण हुक्का ओढत असल्याचे व अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी 55 पुरुष व 20 तरुणींना अटक केली त्यांना इगतपुरी पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरण ीमुख्य आरोपी मनीष नयन झवेरिया (52, रा. विलेपार्ले, मुंबई), माउंटन शॅडो रिसॉर्टचा मालक महेंद्र डोसाभाई मोमाया शहा (रा. शरणपूर, नाशिक), रिसॉर्टचा व्यवस्थापक अमर मोरे (रा. श्रीवर्धन, जि. रायगड), पार्टीचा आयोजक आशिष छेडा (रा. दहीसर, मुंबई), व केतन गडा (रा. कांदिवली, मुंबई) यांच्यासह अन्य पुरुषांना अटक करण्यात आली. तर देहविक्रयासाठी महिला पुरविणार्या मुंबईच्या दोन महिलांनी त्यांच्यासमवेत 18 महिलांना देहविक्रयासाठी आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
या महिलाही हुक्का पार्टीत सामील होऊन देहविक्री करीत असल्याचे आढळून आले. याशिवाय पार्टीत हुक्का पार्टी, विदेशी मद्यसेवन सुरू असल्याने पोलिसांनी पंचनामा करून गुन्हे दाखल केले.या घटनेतील संशयित आरोपी मोठे व्यापारी असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.











