मुंबई- देशात सध्या हीजाब विवाद चर्चेचा विषय बनला असून या प्रकरणावर आतापर्यंत देशातील अनेक राजकीय नेते तसेच बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हिजाब आंदोलन आता कर्नाटक पुरताच मर्यादित राहिला नसून देशातील बहुतेक राज्यात याच्या समर्थनात आंदोलन होत आहे. राज्यात देखील अनेक शहरात आंदोलन झाले आहे.
अशात आता अभिनेत्री सोनम कपूरनंही या वादावर आपलं मत मांडलं आहे. सोनम कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत कर्नाटक हिजाब वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात एका बाजूला हिजाब बांधलेली महिला तर दुसऱ्या पगडी बांधलेला पुरुष दिसत आहे. यातील पगडी असलेल्या फोटोवर हे बांधणं निवड असू शकते असं लिहिलंय. तर हिजाब बांधलेल्या फोटोवर, असा कपडा बांधण्याची तुमची निवड असू शकत नाही असं लिहिलं आहे. यावर स्वतः सोनमनं कोणतीही कमेंट न करताही हिजाब बांधण्यास आपलं समर्थन दिलं आहे. याआधी अभिनेत्री कंगना रणौत, शबाना आझमी, जावेद अख्तर, स्वरा भास्कर, ऋचा चढ्ढा यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली होती.
काय आहे प्रकरण ?
कर्नाटकातील उडुपीमध्ये सरकारी महाविद्यालयात मुस्लीम मुलींना हिजाब घालून प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर या मुलींनी महाविद्यालयाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले होते बघता बघता हे आंदोलन संपूर्ण कर्नाटक मध्ये सुरु झाला आहे. याच्या समर्थनात आणि विरोधात अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे.त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.