मुंबई – भारतात पुन्हा एकदा मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सौदी अरेबिया मध्ये असलेल्या सौदी अरामको या कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे देशातील सर्वसामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. कंपनीने फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये आपल्या आशियाई ग्राहकांसाठी अरब लाइट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ६० सेंटने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
डिसेंबर २०२१ नंतर देशातील बहुतेक शहरामध्ये पेट्रोलचे दर वाढले नाही. देशात सध्या पेट्रोल काही शहरात १०० तर काही शहरात ११० पेक्षा जास्त दराने मिळत आहे तर डिझेल देखील ९० च्या पार गेला आहे.
सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे जर आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ-उत्तर पाहायला मिळाला तर याचा थेट परिणाम भारतातील इंधनांच्या किमतीवर पडू शकतो. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो.
केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या स्थिर आहेत. मात्र, बिहार, राजस्थान आणि मध्यप्रदेश यांच्यासह देशातील इतर राज्यांमध्ये पेट्रोलची १०० रुपयांहून अधिक दाराने विक्री होत आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त आहे. येथे एक लिटर पेट्रोलचा दर ८२.९६ रुपये आहे. एक लिटर डिझेल भरण्यासाठी ७७.१३ रुपये मोजावे लागतील.