दिल्ली – देशाचा सर्वात जुना पक्ष असलेला कॉंग्रेस पक्षाला नुकताच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का लागला. पाचही राज्यात काँग्रेसला अपयश आल्याने काँग्रेस नेतृत्वावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यातच आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोठा निर्णय घेत उत्तराखंड, पंजाब ,मणीपूर , गोवा आणि उत्तर प्रदेश राज्यातील प्रदेश अध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे. पक्षाच्या पूर्ण रचनेसाठी त्यांनी राजीनामा मागितला असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचा अमृतसर पूर्व मतदारसंघातून पराभव झाला. त्यांचा आपच्या जीवन ज्योत कौर यांनी 6,750 मतांनी पराभव केला. तर उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय लल्लू तमकुही राज विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर होते. लल्लू यांना जामीनही वाचवता आला नाही. त्यांना केवळ 14.78% मते मिळाली.
उत्तराखंड काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गोदियाल यांचा श्रीनगर मतदारसंघातून पराभव झाला. त्यांचा भाजपच्या धनसिंह रावत यांनी 587 मतांनी पराभव केला.