शेकडो उड्डाणे रद्द, शाळा बंद, अनेक भागात लॉकडाऊन; अचानक का बंद झाला चीन?
उत्तर चीनमधील अनेक शहरे आणि प्रांतांमध्ये शेकडो विमानांची उड्डाणे अचानक रद्द करण्यात आली आहेत. शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. कोविड -19 ची प्रकरणं पसरल्याचा संशय असलेल्या पर्यटकांच्या गटाला गुरुवारी हे आदेश देण्यात आले आहेत. सरकारने मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्याचे फर्मानही जारी केले आहे. राजधानी बीजिंगने शून्य-कोविड धोरणाअंतर्गत सीमा बंद केल्या आणि काही भागात लॉकडाऊन लादले आहे. तसेच, चीनमधील स्थानिक संसर्गाचे प्रकरण जवळजवळ नगण्य आहे. परंतु देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात कोरोनाची प्रकरणं सातत्याने वाढत आहेत.या नवीन संसर्ग प्रकरणाचा दुवा एका वृद्ध जोडप्याशी संबंधित आहे. जे पर्यटकांच्या गटाचा भाग होते. ते शांघाय, शीआन, गांसु प्रांत आणि इनर मंगोलियाला फिरायला गेले होते. त्यांनी प्रवास केलेल्या भागात, कोरोना संसर्गाची अनेक प्रकरणे सापडली. राजधानी बीजिंगसह सुमारे पाच प्रांत आणि प्रदेशातील अनेक लोकांच्या संपर्कात ते आले आहेत. या खुलाशानंतर, अनेक शहरांच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्याची घोषणा केली आहे. सर्व पिकनिक स्पॉट्स, पर्यटन स्थळे, शाळा, सिनेमागृहे बंद करण्यात आली आहेत. अनेक भागात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.काही क्षेत्रांमध्ये आणि 40 लाख लोकसंख्येचे शहर असलेल्या लान्झोऊमध्ये लोकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांना बाहेर जायचे आहे त्यांना त्यांचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. त्याच वेळी, विमानतळ देखील बंद होते, ज्यामुळे शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शहरात हालचालींवर बंदी घातल्याती सूचना इनर मंगोलियामध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगलियामध्ये उद्रेक झाल्यामुळे कोळशाच्या आयातीवर बंदी घातली जाऊ शकते, ज्यामुळे चीनमधील विजेचे संकट अधिक गडद होऊ शकते.












