मुंबई- बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. ती नेहमी आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकताच तिला न्यायालयाने १४ वर्ष जुन्या प्रकरणात मोठा दिलासा देत तिची निर्दोष सुटका केली आहे.
२००७ मध्ये एड्स जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेअरने तिचा चुंबन घेतला होता यामुळे शिल्पा विरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करण्याच्या आरोपासह माहिती तंत्रज्ञान कायदा आणि महिला सुरक्षा कायद्यानुसार फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात आता शिल्पाला निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या कार्यक्रमात रिचर्ड गेअरने अचानकपणे घेतलेल्या चुंबनाने शिल्पाही अवाक् झाली होती. तिच्याकडून त्याला काहीच प्रतिसाद दिला गेला नाही. त्यामुळे यात तिचा काहीच दोष असल्याचे दिसत नाही. त्यामुळे तिच्या विरोधातील तक्रारीत काहीही तथ्य दिसत नसल्याचे निरीक्षण नोंदवत महानगरदंडाधिकारी केतकी चव्हाण यांनी शिल्पाची या प्रकणातून निर्दोष सुटका केली.
या कार्यक्रमाला रिचर्ड गेअर आणि शिल्पा शेट्टीने उपस्थिती लावली होती. मात्र कार्यक्रमाच्या वेळी रिचर्ड गेअरने शिल्पाला मिठी मारत अचानक तिच्या गालाचे चुंबन घेतले. यावरून त्यावेळी वाद झाला होता. दोघांविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याचा ठपका ठेवत उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये एकूण तीन फौजदारी तक्रारी नोंदवण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रकरण मुंबई येथील न्यायालयात वर्ग करण्यात आले. शिल्पाने गेअरला प्रतिबंध केला नाही, असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र जे घडले ते आकस्मिक होते आणि प्रतिबंध केला नाही म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असा युक्तिवाद शिल्पाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता.











