वाळकीच्या ओंकार भालसिंग खूनप्रकरणातला आणि मोक्काच्या गुन्ह्यात मागील दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी नगर एलसीबीने जेरबंद केला

वाळकीच्या ओंकार भालसिंग खूनप्रकरणातला आणि मोक्काच्या गुन्ह्यात मागील दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी नगर एलसीबीने केला जेरबंदनगर तालुक्यातल्या वाळकीच्या ओंकार भालसिंग खूनप्रकरणातला आणि मोक्काच्या गुन्ह्यात मागील दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी नगर एलसीबीने जेरबंद केलाय. सचिन चंद्रकांत भांबरे असं त्याचं नाव असून नाशिक जिल्ह्यातल्या गिरनारे येथे त्याला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं.नगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामिण उपविभगीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि गणेश इंगळे, सपोनि दिनकर मुंडे, सफौ राजेंद्र वाघ, सफौ संजय खंडागळे, पोहेकॉ बापपूसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना भिमराज खर्से, विशाल दळवी, रवि सोनटक्के आणि चालक पोहेकॉ उमाकांत गावडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.सन २०२० वर्षी मयत ओंकार बाबासाहेब भालसिंग (रा. वाळकी, ता. नगर) याने वाळकी गावातील चौकामध्ये विश्वजित प्रतिष्ठानचे वतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास विरोध केला होता. त्याचा राग मनात धरुन विश्वजीत कासार (रा. वाळकी) आणि त्याच्या इतर साथीदारांनी दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी ओंकार भालसिंग हा मोटार सायकलवरुन घरी जात असताना त्यास समोरुन चारचाकी वाहनाने धडक देवून खाली पाडून लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याचा खून केला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने करुन गुन्ह्यातील मुख्य आरोपी विश्वजीत रमेश कासार आणि त्याच्या चार साथीदारांना यापूर्वी अटक केलेली आहे. या आरोपींविरुध्द यापूर्वी गुन्हे दाखल असल्याने आणि आरोपी हे संघटीतपणे गुन्हे करीत असल्याने सदर गुन्ह्यास मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी) कलम ३ (१) (i), ३ (२), ३(४) ही कलमे लावण्यात आलेली आहेत. हा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी सचिन चंद्रकांत भांबरे हा फरार होता. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पो. नि. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या स्वतंत्र पथकाची नेमणूक करून पथकाने आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे आरोपी सचिन चंद्रकांत भांबरे याचा शोध घेत असताना पोनि कटके यांना आरोपी सचिन भांबरे हा गिरनारे (जि. नाशिक) येथे येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी गिरनारे (जि. नाशिक) येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता एकजण संशयितरित्या फिरतांना दिसला. त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने, त्याचे नाव सचिन चंद्रकांत भांबरे (वय ३८, रा. बाबुराव नगर, घोडनदी शिरुर, जि. पुणे) असे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेऊन नगर तालुका पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. पुढील कारवाई नगर तालुका पोलीस करीत आहेत.आरोपी सचिन चंद्रकांत भांबरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द यापूर्वी शिरुर (जि. पुणे) येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here