अहमदनगर- राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. सोनल अदिनाथ शिरसाठ (वय १७ रा. भगवान बाबा चौक, निर्मलनगर, नगर) असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान सोनल हिने कोणत्या कारणामुळे गळफास घेतला, याचा शोध तोफखाना पोलीस घेत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी रात्रीच्यावेळी घरामध्ये सोनलचे आई-वडिल, भाऊ आदी कुटुंबातील व्यक्ती घरात होते. रात्रीच्यावेळी सोनलने राहत्या घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. याबाबतची माहिती बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तोफखाना पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर, पोलीस नाईक संभाजी बडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
मृत सोनल हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस नाईक बड़े करीत आहेत. दरम्यान सोनल शिरसाठ हिने गळफास घेण्यामागे काय कारण होते, याचा शोध पोलिसांकडून सुरू झाला आहे.