राज्य सरकारच्या 50 टक्के कर माफीचा वाहनधारकांना फायदा; वाचा कोणाला मिळणार
पुणे : व्यावसायिक वापराच्या ज्या वाहन मालकांनी मागील वर्षाचा वार्षिक कर 31 मार्चपूर्वी भरला आहे, त्यांनाच सध्याच्या वर्षी राज्य सरकारने केलेल्या 50 टक्के माफीचा लाभ मिळेल, असे परिवहन आयुक्त कार्यालयाने एका आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये व्यावसायिक वापराची बहुसंख्य वाहने जागेवर उभी होती. त्या वाहनांचा एक एप्रिल ते 31 डिसेंबर दरम्यानचा कर माफ करावा, अशी मागणी मालवाहतूकदार संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यासाठी वारंवार आंदोलनेही केली होती. बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाने (बोकी) त्यासाठी खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, परिवहन मंत्री अनिल परब आदींची भेट घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारने गेल्या महिन्यांत व्यावसायिक वापराच्या वाहनांसाठी कर सहा महिन्यांसाठी माफ करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यामध्ये या वर्षी 31 मार्चपर्यंत कर भरणा केलेल्या वाहनमालकांनाच कर माफी मिळेल, असा आदेश उपसचिव प्रकाश साबळे यांनी नुकताच दिला आहे.











