मुंबई – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामूळे राज्य सरकार हळूहळू अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता देत आहे. यातच राज्यात मास्क सक्तीपासून मुक्ती मिळणार असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांनी सुरू आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी भाष्य केलं आहे.
अजित पवार यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंसोबत त्यांच्या वरळी तसचं दादर, माहीम परिसरातील विकासकामांची पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांना मास्कमुक्तीसंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळात मास्कपासून मुक्ती मिळणार असल्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. जोपर्यंत कोरोना जात नाही तोपर्यंत मास्क लावावाच लागेल असं मी याआधीही सांगितलं आहे. आमची जेव्हा कधी मंत्रिमंडळ बैठक होते तेव्हा काही चॅनेल अशा बातम्या चालवतात. अशा काही बातम्या चालवू नका. ज्यावेळी मास्क काढण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू. तोपर्यंत मास्क ठेवायचा म्हणजे ठेवायचा असल्याची प्रतिक्रीया त्यांनी या वेळी दिली.
अजित पवार आणि आदित्य ठाकरेंच्या या एकत्रित पाहणी दौऱ्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला गाडी चालवण्याची आवड असते. मुख्यमंत्रीदेखील अनेकदा मातोश्रीवरुन वर्षावर येताना गाडी चालवतात. गाडी चालवली म्हणून असे अंदाज बांधण्याची गरज नाही. आमचं तीन पक्षांचं सरकार असून काही मित्रपक्षांनीही पाठिंबा दिला आहे.











