मालेगाव – महाविकास आघडीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाचे २८ नगरसेवकांना पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवेश दिला आहे. मालेगावमधील २८ नगरसेवकांनी आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या नगरसेवकांना त्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन यावेळी दिले.
अजित पवार म्हणाले कि नाशिकचा विकास झाला, तसाच मालेगावच्या बाबतीत देखील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने एकत्र बसून चर्चा करू. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत येण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे, हे तुम्हाला कामातून सिद्ध करून दाखवू, ही ग्वाही मी सर्व सहकार्यांना देऊ इच्छितो. अनेक प्रश्न निर्माण होणार आहेतच. पण त्यातून मार्ग काढण्याचं काम आपण करू, असं पवार म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले कि नवाब मलिकांकडे असलेल्या विभागाच्या माध्यमातून राज्यातल्या तरुणांना उभं करण्याचं काम आपण करतो. आपल्या समाजात इतरांच्या तुलनेत शिक्षण कमी आहे. त्यावर कसं काम करता येईल, त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मौलाना आझाद मंडळाच्या माध्यमातून कशी मदत करता येईल, यासाठी काम केलं जात आहे.
नव्याने राष्ट्रवादीत दाखल झालेल्या नगरसेवकांचे अजित पवारांनी यावेळी कान टोचले. “आपल्याकडून कुठली चूक होऊ देऊ नका. कायद्याचं, नियमाचं उल्लंघन होणार नाही, ही खबरदारीही आपण घ्या. नाहीतर राष्ट्रवादी पक्षात आपण गेलोय, गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे, पालकमंत्री आपले आहेत, भुजबळ साहेब घरचे आहेत, प्रांताध्यक्ष आपले आहेत, अजित पवार आपले आहेत असं म्हणाल. आम्ही जरूर तुमचे आहोत. पण तुमच्या कुठल्या कृतीतून राष्ट्रवादी पक्षाला, नेत्याला कमीपणा येईल. शरद पवारांची मान शरमेनं खाली जाईल, अशी कृती अगदी छोट्या कार्यकर्त्याकडून देखील घडता कामा नये, याची खबरदारी आपण घ्यायला हवी. आता तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलणार आहे, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवा, असं अजित पवार यावेळी म्हणाले.