मुंबई – राज्यात सत्तेत असणारी महविकास आघडी सरकारच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यातील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून त्यांची केंद्रिय तपास यंत्रणेकडून तपास सुरू आहे. तर आता दुसरीकडे सरकारला पाठिंबा देणारा एक घटकपक्ष असलेल्या राजू शेटींनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडणार असल्याबाबत सूचक विधान केलं आहे.
राजू शेट्टी यांनी २०१९मध्ये महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. राज्य सरकारने सभागृह नेता म्हणून उद्धव ठाकरेंची निवड करताना सूचक म्हणून राजू शेट्टींचं नाव घेतलं होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा काढल्यामुळे राज्य सरकारच्या स्थैर्याला फारसा धक्का लागणार नसला, तरी आघाडीतील एक मित्रपक्ष नाराज होऊन बाहेर पडला, तर जनमतावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.
पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी संवाद नाही
राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर संवाद साधत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. “या सरकारला अडीच वर्ष होत आली आहेत. महाविकास आघाडी सरकारचं समीक्षण करण्याची आता वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर ही महाविकास आघाडी अस्तित्वात आली, त्या किमान समान कार्यक्रमाचं काय झालं?” असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
अनेक मुद्दे खटकणारे आहेत
राज्य सरकारच्या धोरणामधले अनेक मुद्दे खटकणारे असल्याचं राजू शेट्टी म्हणाले आहेत. “स्वाभिमानी ही शेतकरी, शेतमजुरांमध्ये काम करणारी संघटना आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षातल्या धोरणाचं परीक्षण करायचं आहे. अनेक मुद्दे खटकणारे आहेत. अनेक मुद्द्यांबाबत फक्त किमान समान कार्यक्रम म्हटलं गेलं. पण एखादं नवीन धोरण राबवत असताना महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी संवाद साधण्यात आला नाही”, अशा शब्दांत राजू शेट्टींनी नाराजी व्यक्त केली.