मुंबई – देशातील पाच राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी ( assembly election) मतदान होणार आहे. यासाठी प्रत्येक पक्ष आप आपल्या तयारीत लागला आहे. माञ देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने सर्व पक्ष ऑनलाईन पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
संवादात विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी बिनधास्तपणे उत्तरे दिली. हस्तिनापूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आणि चित्रपट अभिनेत्री अर्चना गौतम यांच्यावर टिप्पणी करणाऱ्यांनाही प्रियंका गांधींनी जोरदार प्रत्युत्तर दिले.मोदींना किंवा दुसऱ्या पुरुषांना लग्नाबाबत का विचारले जात नाही. ते कधी आणि कोणासोबत लग्न करणार हेही त्यांना विचारायला हवे. असे प्रश्न फक्त महिलांनाच का विचारले जातात? पुरुषांना असे प्रश्न का विचारले जात नाहीत?, असे प्रत्युत्तर प्रियांका गांधी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिले.
माध्यमे आमच्या उमेदवाराला विचारत आहे की ती कधी लग्न करणार आहे. तुम्ही कोणते कपडे घालता? असे प्रश्न नरेंद्र मोदींना का विचारले जात नाहीत. ते कोणाशी लग्न करणार किंवा करणार नाही हे मोदींना का विचारले जात नाही. असे प्रश्न इतर पुरुषांना का विचारले जात नाहीत? असे प्रश्न फक्त महिलांनाच का विचारले जातात, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.अर्चना गौतमने खूप संघर्ष करून आपले आयुष्य घडवले आहे. लोक तिला ओळखू शकतील अशा टप्प्यावर ती पोहोचली आहे. अर्चना गौतम महिलांची सेवा आणि हस्तिनापूरच्या विकासावर बोलत आहेत.
सार्वजनिक समस्या मांडण्यावर तिने भर दिला आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.त्याचवेळी हस्तिनापूरमधील काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्री अर्चना गौतम म्हणाल्या की, माझ्या समर्थनात येऊन प्रियांका गांधींनी महिलाविरोधी आणि विकासविरोधी विचार करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.