मुंबई गँगवारचा आरोपी नगर पोलिसांनी केला जेरंबद! शिवसेना तालुकाप्रमुखाच्या हत्येनंतर आठ वर्षे होता फरार! नगर एलसीबीची दमदार कामगिरी!
पुण्यातले बांधकाम व्यावसायिक फैजल खान, श्रीगोंदा तालुक्यातल्या बेलवंडी येथील आकाश मापारी हत्याकांड आणि नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्याचे शिवसेना तालूका प्रमुख शंकर पाटील ठाणेकर यांच्या हत्येह मुंबई गँगवारमधला आरोपी भरत विठ्ठल एडके याला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलंय.
नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या कामगिरीसंदर्भात पत्रकारांना आज माहिती दिली.जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, ‘गंभीर गुन्ह्यात गेली आठ वर्षे फरार असलेला भरत एडके हा आरोपी पुण्यातल्या कोथरुडमध्ये एका केटरर्सकडे काम करत असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली.
त्यानुसार नगर एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आणि त्यांच्या विशेष पथकातले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोलीस हेड काँस्टेबल बापूसाहेब फोलाने, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक भीमराज खर्से, सुरेश माळी, रवि सोनटक्के, चालक पोहेकाँ चंद्रकांत कुसळकर या सर्वांनी ही दमदार कामगिरी केली.या विशेष पथकातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी कोथरुड येथे जाऊन आरोपीची माहिती घेतली. 
दरम्यानच्या कालावधीमध्ये आरोपी भरत एडके हा चांदणी चौक, कोथरुड येथे येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली.त्यानुसार या पथकाने या ठिकाणी सापळा लावला.
थोड्याच वेळात भरत एडके हा चांदणी चौक, कोथरुड येथे संशयितरित्या फिरताना या पथकाला दिसला.
खात्री पटताच पथकातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी एडके याला शिताफीने ताब्यात घेतलं.त्याच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने भरत विठ्ठल एडके (रा. भाईंदर, जिल्हा ठाणे) असं त्याचं नाव सांगितलं.
आरोपी भरत एडकेविरुध्द भादंवि ३९६, ३४१, ३२३, ५०४, ५०६ सह आर्म अॅक्ट ३ / २५ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियन १९९९ चे (मोक्का)चे कलम (३) (1) (।।), ३ (२) आणि (४) प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, भरत एडके हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द विविध पोलीस ठाण्यांत मोक्का, खून, खुनासह दरोडा, जबरी चोरी असे एकूण १० गुन्हे दाखल आहे.
या दमदार कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आणि त्यांच्या सर्वच सहकारी, कर्मचार्यांचे खास अभिनंदन करत या कामगिरीबद्दल पोलीस कर्मचार्यांना बक्षीस देण्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपस्थित होते.












