मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना काँग्रेससह खासदार राहुल गांधी यांच्यावर देखील जोरदार टिका केली होती. आता या टीकेला काँगेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर दिले आहे. ते उत्तराखंडमध्ये निवडणूक प्रचारासाठी आयोजित एका सभेमध्ये बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील त्यांचा पूर्ण वेळ काँग्रेसबद्दल बोलण्यासाठी दिला. पण त्यांनी चीनबाबत मी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं नाही असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले मी मोदींचं का ऐकू? नरेंद्र मोदींनी नोटाबंदी, जीएसटीच्या माध्यमातून देशातील लघु आणि मध्यम उद्योजक, शेतकरी आणि कामगार यांचं मोठं नुकसान केलं आहे. मी त्यांना घाबरत नाही. त्यांच्या उद्धटपणामुळे मला हसू येतं असं राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये जे काही ऐकतच नाहीत, त्यांच्या विधानावर मी काय स्पष्टीकरण देणार, असं राहुल गांधींना उद्देशून म्हटलं होतं. त्यावर राहुल गांधींनी उत्तर देत म्हणाले की त्यांच्या मुलाखतीमध्ये मोदी म्हणतात राहुल गांधी ऐकत नाहीत’. तुम्हाला याचा अर्थ कळला का? याचा अर्थ ईडी किंवा सीबीआयचा दबाव राहुल गांधींवर काम करत नाही. (त्यांना म्हणायचंय) राहुल गांधी माझं ऐकत नाहीत. मी त्यांच्यावर कितीही दबाव टाकला, तरी ते मागे हटत नाहीत. ते ऐकत नाहीत असं राहुल गांधी म्हणाले आहेत.












