सातारा – शेततळ्यात बुडून बहीण आणि भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील रोमन वाडी (येराड) येथे सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेमध्ये सौरभ अनिल पवार (वय १६) आणि पायल अनिल पवार (वय १४) असे मृत्यू झालेले भाऊ आणि बहिणीचे नाव आहे.
रोमनवाडी येथील एका फार्म हाऊसवर कामावर असलेले सचिन जाधव यांच्याकडे पाहुणे म्हणून अनिल पवार (रा. काठी ता. पाटण) हे आपली पत्नी व दोन मुलांसमवेत आले होते. यावेळी सौरभ आणि पायल हे दोघे बहीण भाऊ पळत शेततळ्याकडे गेली . यावेळी सौरवचा शेततळ्यात पाय घसरल्याने तो बुडत असल्याचं पाहून त्याला वाचवण्यासाठी बहीण पायल गेली मात्र ती सुद्धा पाण्यात बुडाली.
हा प्रकार सचिन जाधव व मुलाचे आई-वडील यांना समजातच त्यांनी लगेचच तळ्याच्या दिशेनं धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोन्हीही मुले पाण्यात बुडालेली होती. यानंतर रात्री ८ वाजता शिरळ येथील मासेमारी करणाऱ्या लोकांनी दोन्ही मुलांना बाहेर काढले. रात्री उशिरा पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.