अहमदनगर – पहिली पत्नी व दोन मुले असतानाही दुसऱ्या महिलेसोबत बेकायदेशीरपणे लग्न करून तिसऱ्या अपत्याला जन्म देणाऱ्या नगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा भंग केल्याप्रकरणी पोलीस सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी या पोलीस कर्मचाऱ्याच्या पहिल्या पत्नीने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या एक पोलीस हवालदार हा सध्या पोलीस मुख्यालय येथे नियुक्तीवर आहे. नोकरी करत असताना कुठलीही परवानगी न घेता त्याने फल ज्योतिष अभ्यास मंडळ संस्था पुणे येथून ज्योतिषाची पदवी घेतली असून तो पोलीस दलात असतानाही लोकांचे भविष्यही पाहत आहे. भविष्य पाहता पाहता त्याने एक महिलेशी विवाहबाह्य संबंध ठेवले.
त्यानंतर त्या महिलेला त्याच्याकडून एक अपत्य झाले आहे. त्याचा १९९३ मध्ये पहिला विवाह झालेला असून त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. या नंतरच्या विवाहबाह्य संबंधातून आणखी एक अपत्य झाले असल्याची माहिती समोर आली असून एकूण तीन अपत्ये असतानाही व्यक्ती पोलीस दलामध्ये कार्यरत कशी, असा सवालही त्याच्या पहिल्या पत्नीने उपस्थित केला आहे.