बिल गेट्स यांनी दिला इशारा; म्हणाले, लवकरच जगावर आणखी एका महामारीचं संकट

387

मुंबई – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक असणारे आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी इशारा देत जगामध्ये लवकरच कोरोना नंतर आणखी एक महामारीचं संकट येणार असल्याचे म्हटले आहे. वेगळ्या संसर्गामुळे ही महामारी येईल असं सांगताना कोरोनाशी त्याचा काही संबंध नसेल असंही म्हटलं आहे.

तर याचवेळी लसींची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने कोरोनापासून होणाऱ्या गंभीर संसर्गाचा धोका कमी झाला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

बिल गेट्स यांनी डिसेंबर महिन्यात ओमायक्रॉनची लाट येईल अशा इशारा दिला आहे. आपल्या ‘Gates Notes’ ब्लॉगमध्ये ते नेहमीच हवामानातील बदल आणि जागितक आरोग्याच्या मुद्द्यावर चर्चा करत असतात. बिल गेट्स आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी मेलिंडा यांनी सुरु केलेली बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स संस्था आरोग्य क्षेत्र तसंच अविकसित देशांमधील गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न करत असते.

बिल गेट्स म्हणाले की लवकरच आणखी एक महामारी येणार आहे . मात्र ही पुढील महामारी कोरोनापेक्षा वेगळी असेल असंही ते म्हणाले आहेत. गंभीर आजारांचा धोका आणि तोदेखील खासकरुन वृद्ध, जाड आणि मधुमेह असणाऱ्यांसाठी आता संसर्गाच्या माहितीमुळे मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे, असं बिल गेट्स म्हणाले आहेत.

यावेळी बिल गेट्स यांनी जागतिक आरोग्य संघटनेने २०२२ पर्यंत संपूर्ण जगाचं लसीकरण करण्याचा निर्धार केल्यासंबंधी बोलताना हे खूपच उशीरा असल्याची टीका केली. मात्र कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने दिलासा असल्याचं ते म्हणाले आहेत. सध्याच्या घडीला जगातील एकूण ६१ टक्के लोकांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला आहे.

बिल गेट्स यांनी यावेळी आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान मोलाची भूमिका निभावू शकतं असं म्हटलं आहे. पुढील महामारीसाठी तयार राहणं जास्त खर्चिक नाही. हे काही ग्लोबल वॉर्मिंगसारखं नाही. जर आपण नीट प्रयत्न केले तर पुढील वेळी महामारीच्या एक पाऊल पुढे असू असं बिल गेट्स म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here