अहमदनगर- जिल्हयातील श्रीगोंदा तालुक्यात सूरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत आज गणिताचा पेपर फुटला असल्याची चर्चा आज सकाळ पासूनच सुरु आहे. मात्र या प्रकरणात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तालुका शिक्षण अधिकारी यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात बारावीच्या परीक्षा सुरु आहेत याच परीक्षेमधील गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा श्रीगोंदा तालुक्यात पसरल्याने मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे पाऊण तास उत्तरासहित प्रश्नपत्रिका यांच्या मोबाईलच्या व्हाट्सअप वर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गट शिक्षण विभागाने मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका व परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.आज सकाळी साडेदहा वाजता गणित या विषयाची पेपर होता.
मात्र तत्पूर्वीच सुमारे पावणे दहाच्या सुमारास श्रीगोंदा येथील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित मिळाली होती. अर्थात त्याचे उगमस्थान श्रीगोंदे की दुसरे कुठे हे समजण्यास मार्ग नसला तरी गणिताचा पेपर फुटला हे वास्तव नाकारता येत नाही. श्रीगोंद्यात सोशल मीडियावर उत्तरासहित प्रश्नपत्रिका आल्याने हा पेपर काही काळ अगोदरच फुटला असावा याला दुजोरा मिळत आहे.
याबाबत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील वाळके यांना विचारले असता त्यांनी खात्री करून मोबाईलवर आगोदर मिळालेले प्रश्नपत्रिका परीक्षेतील एकच असल्याचे मान्य केले.मात्र हा प्रकार श्रीगोंद्यातील झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला.त्यामुळे श्रीगोंद्यात बारावीचा गणिताचा पेपर कोठून फुटला याबाबत गटशिक्षण अधिकारी माहिती घेत आहेत त्याच्या खुलाश्या नंतर पेपर फुटला का नाही याचे सत्य समोर येईल मात्र हि बाब महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लक्षात आल्यावर त्यांनी तालुका शिक्षण अधिकारी याना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी श्रीगोंदा गटशिक्षण अधिकारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











