पोलीस अधीक्षक कार्यालयातील हेड कॉन्स्टेबलची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
अहमदनगर (प्रतिनिधी) -जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात नेमणुकीस असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ बापू कांबळे (वय ४६, रा. विळद ता. नगर) यांनी अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.कांबळे यांनी ४ दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात विषारी औषध प्राशन केले होते.
त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरूवारी (दि.१७) दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रात्री विळद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. कांबळे परिवाराकडे विळद येथील ग्रामदैवत म्हसोबा देवस्थान चे पुजारी पद आहे.
कांबळे हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात नेमणुकीस होते. त्यांनी अनेक हरवलेल्या मुले-मुली, महिला-पुरूष यांचा शोध घेण्याचे काम केले आहे. त्यांनी कोणत्या कारणातून विष घेतले याची माहिती मिळू शकली नाही.
पोलीस अंमलदाराने विष घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस दलात पसरल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे











