उत्तर प्रदेश – काही दिवसांपूर्वी राज्याच्या अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मालिक यांना इडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे. यानंतर संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे. यातच आता एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील या प्रकरणांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत प्रश्न उपस्थित केला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आयोजित एका जाहीर सभेमध्ये बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी समाजवादी पक्षासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील निशाणा साधला. आजम जेलमध्ये असताना अखिलेश यादव बाहेर कसे आहेत हे सांगा. महाराष्ट्रात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरोधात जलसिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. ते बाहेर आहेत आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत कस काय? असा प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.
नवाब मलिक यांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली बुधवारी अटक करण्यात आली. त्यांच्या घरी बुधवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकानं धाड टाकली. त्यानंतर तासाभराने त्यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं. तिथे दुपारी तीनच्या सुमारास त्यांना अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर नवाब मलिक यांची 7 दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी करण्यात आली.