नगरच्या हौशी रंगभूमीवरील तारा निखळला ! अभिनेता प्रशांत सिताकांत कांबळे-कायमचा सोडुन गेला !
प्रशांत सिताकांत कांबळे या माणसाला मी कधीच जेष्ट, आदरणीय, मोठा व्यक्ती असे संबोधणार नाही … कारण तो हे सर्व जरी होता तरी तो एक मित्र म्हणुन वयाने मोठा असला तरी मनाच्या कप्यात नेहमी एक सच्चा मित्र म्हणुनच आहे व राहिल. मी, चंद्रकांत सैंदाणे (आबा) आणि प्रशांत कांबळे उर्फ पांड्या यांचे मैत्रीचे नाते हे सर्व नाते संबंधाच्या पलीकडील होते व आहे. आमच्या त्रिकुटातील कोणालाही काय झाले तरी होणारी पांड्याची तगमग मी जवळहुन पाहिली आहे. जेष्ट नाटयकर्मी पी.डी.कुलकर्णी पासुन ते मोहन सैद पर्यत,सतीश शिंगटे,श्रेणिक शिंगवी, शैलेश मोडक पासुन तर रविंद्र व्यवहारे- रियाज पठाण, अविनाश कराळे, प्रसाद बेडेकर पर्यत,आणि आजच्या कलावंतांमध्ये संदिप दंडवते, प्रशांत जठार,गणेश लिमकर पासुन ते स्वप्निल नजान पर्यंत पांड्या हा सर्वांचा सच्चा मित्र ! ॲड.शिवाजी कराळे, सुधीर कुलकर्णी, मोहिनीराज गटणे हे कट्टा मित्र तर त्याचे नित्याचे ! पांड्याचा नाते संबंधातील- कुळाचारातील परिवार तसा फारच सिमीत मात्र मित्र परिवार फार दांडगा होता. कलावंतांची माणुस म्हणुन होणारी अंतरीक घुसमटं प्रत्यक्षात शेवटच्या क्षणापर्यत जगणारा नगरच्या रंगभुमी वरील सच्चा कलावंत प्रशांत रंगभुमीला पोरकं करुन कायमचा सोडुन अनंतात विलिन झाला. हौशी रंगभुमीचा जीव की प्राण म्हणावे असा बाप-नट म्हणुन प्रशांत सर्वदुर नगरकरांच्या मनात परिचित होता. नाटकातील प्रत्येक भुमिका पश्याने त्याच्या नाटय कारकिर्दीत जगवल्या …. जगणे हे भुमिकांच्याच माध्यमातुन बहुतेक तो जगला असावा,असेच वाटते …. किमान ते आता तरी ! नाटक, नाटक आणि फक्त नाटक याविषया पुरताच त्याचा आणि माझा सुरुवातीचा संपर्क… पण नकळत तो कधी माझा जवळचा मित्र झाला … माझा कुंटुंबाचा एक सदस्य झाला … ते कळलेच नाही. चालण्या-बोलण्यात कंखर वाटणारा प्रशांत उर्फ पांड्या तितकाच हळवा आणि प्रेमळ होतो, हे सर्वाना माहिती असेलच … पण कोरोना प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या लॉकडाउन परिस्थितीमुळे आमचा पांड्या आतुन तुटतं होता … घुसमटतं होता …. एकटा-एकटा वाटतं होता. या चार महिन्यात खुपदा भेटुन त्याला सांगायचो, “तु स्वता:ला एकटं समजु नकोस, तुला काहीही लागले तर सांग” पण शेवटी हाडाचा कलावंत तो … कोणाला काही मागणे … हे कलावंताच्या स्वाभिमानाच्या व्याख्येत बसतं नाही ! हसत- खेळत, चिडुन, शिव्या देउन, चेष्टा मस्करी करत आपल्या पांड्या आपल्याला सोडुन वैकुंठाला निघुन गेला, यावर अजुन ही विश्वास बसतं नाही. पांड्या … काळ तोंड्या …. तुझं आता कधीच दर्शन होणार नाही का रे ….?
राज्य नाटय स्पर्धा, एकांकिका स्पर्धाआणि इतर नाट्य विषयक कार्यक्रमात अवर्जुन उपस्थिती दर्शविणारा पांड्या आता परत कधीच दिसणार नाहीये. प्रयोगानंतर झालेल्या सादरीकरणाबाबत भरभरुन आणि स्पष्ट बोलणारा पांड्या कधीच बोलणार नाही. महान नाटयकर्मीचा आव आणुन नाटयगृहा बाहेर नाटक सोडुन वावरणाऱ्या नाटय झग्यांवर शिव्या देवुन टिका टिपणी करणारा पांड्या आता कधीच कोणावर टिका टिपणी करणार नाही. नाटकातील अतिशहाण्या नाटयकर्मीची शाब्दिक शाळा घेणारा पांड्या आता कोणाचीच शाळा घेणार नाही. पांड्या समोर उभा आहे हे पाहुन भितीने स्व: ताचा रस्ता बदलणारे आता भिती न बाळगता नाटयगृहाच्या आवरातं फिरु शकतात. नाटकाच्या वेगवेगळ्या विषयांवर रात्रीचे तीन काय किंवा पहाटेचे पाच वाजेपर्यत काय शशिकांत नजान आणि मला झोपेतुन उठुन गप्पा मारत बसणारा पांड्या कधीच रात्री उपरात्री फोन करुन आणि प्रत्येक्ष घरी येउन त्रास देणार नाही.
नटश्रेष्ट स्व.जयदेव हट्टगंड्डी यांच्या नाटय तालमीत तयार झालेला पांड्या अभिनयात अत्यंत पारंगत होताच पण नाटकाच्या थेरी प्रशिक्षणा पेक्षा प्रॅक्टीकल अभिनय व तंत्र कार्यपध्दतीवर जास्तीत जास्त भर देउन नाटकाचे थडे गिरवले गेले पाहिजेत, असे नवदित कलावंतांना तो नेहमी सांगायचा. हातचा एक, तर्पण, मन धुवाधार, थॅक्यु मिस्टर ग्लाड अशा अनेक नाटकातुन प्रशांतने फक्त अभिनयच नाही केला तर नगरकर नाटय रसिकांच्या मनात एक गुणी कलावंत म्हणुन अधिराज्य केले. नाटका सोबतच काही मोजके पण लक्षवेधी चित्रपट प्रशांतने केले. दिग्दर्शक नागराज मंजुळे या मित्रासोबत प्रशांत कांबळे याने पिस्तुल्या हा लघुपट केला तर फॅंड्री हा चित्रपट केला. अनेक व्यावसायिक नाटकाला त्याने तंत्र सहाय्यक म्हणुन काम केले आहे. अभिनयासह प्रकाश योजना आणि संगीताची एक उत्तम जाण प्रशांतला होती.
पांडुरंगा सारखा काळा रंग असणारा प्रशांत कांबळे याला पांडु हे नावं दिले ते प्रशांत कांबळेचे जवळचे मित्र व नाटयकर्मी सतीशजी लोटके यांच्या मातोश्रींनी. प्रशांतचा पांडु आणि पांडुचा पांड्या,फॅंड्री अजुन काय काय हा माणुस झाला ! रंगकर्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातुन अनेक नाटकांना आणि एकांकिकेना पांड्याने बॅकस्टेज केले. उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार, पार्श्व संगीत नियोजक आणि जहालं समीक्षक अशा अनेक पैलुत या पांडुरंगाचे मी प्रत्येक्षात अनुभूती अनुभवली आहे. रंगमंचावरील एक अत्यंत सयमी – अभ्यासपुर्ण भुमिका वटवणारा नट प्रत्यक्ष आयुष्यात मात्र सर्वात असुन एकटाच होता … एकटाच राहिला …. स्वछंद आयुष्य जगला … दुखाने भरलेल्या आयुष्यात सुखाची एक छोटीशी झुळूक मनसोक्त जगुन आपल्या सोडुन कायमचा निघुन गेला …. तो गेला याचे तर वाईट वाटतेच पण त्याची तीव्रता अजुन वाढते जेव्हा जाणवते तो गेला पण त्याच्या वृध्द आईला मागे सोडुन गेला … यावयात तिला परमेश्वर हे एवढं आभाळभर कोसळलेलं दुख: पचविणाची सहनशक्ती देवो, हीच प्रार्थना !
पांड्या आता तु जेथे कुठे असशील तिथं सुखी रहा … आनंदी रहा … आणि हो आमच्यावर जीवपाड प्रेम करत रहा …. तुझी जीवन प्रवासातील एक्झिट कायम मनाला हुरहुर लावणारी असेल आणि असेल तुझा सोबतच्या आठवणींचा ठेवा …. नटेश्वर तुला शांती देवो !
– रितेश साळुंके
अहमदनगर