अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये मित्राने आपल्याच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील नितीन अंकुश पोटरे (वय 35 वर्ष) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
नितीन याचे दोन मित्र आनंद बबन परहर व जावेद अरबाज शेख (राहणार पिंपळवाडी) यांनी कुकडी कालव्याच्या पाण्यामध्ये बुडवून निर्घुणपणे खून करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये महेश अंकुश पोटरे राहणार पिंपळवाडी यांच्या फिर्यादीवरून दोघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश अंकुष पोटरे यांनी दिलेल्या फिर्यादीत मध्ये म्हटले आहे की, 23 जानेवारी या सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नितीन पोटरे घरांमधून मी आनंद परहर , व जावेद शेख या दोन मित्रांकडे जाऊन येतो असे म्हणून घराच्या बाहेर पडला, मात्र तो घरी परत आलाच नाही, रात्री उशिरा घरातील नातेवाईक मयत नितीन यास फोन करत होते परंतु त्याचा फोनही लागत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय पोटरे व इतर नातेवाईकांनी नितीन याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही.
दरम्यान जावेद शेख यांनी नितीन याची मोटरसायकल घरी आणून लावली व सांगितले की, मी नितीन व आनंद हे तिघेजण रात्री बरोबरच होतो, आम्ही तिघेही दारू पिलो होतो मात्र मी नितीन ची गाडी घेऊन पुढे आलो असून खूप दारू पिला असल्यामुळे तो आनंद परहर याच्यासोबत होता मला काही माहिती नाही.
यानंतर याप्रकरणी आनंद परहर यास विचारणा केली असता त्याने सांगितले की रात्री नऊ वाजता मी नितीन यास जावेद शेख यांच्या घराजवळ सोडले आहे . तिथून पुढे तो कुठे गेला मला माहिती नाही. यानंतर नातेवाइकांनी नितीन आनंद परहर व जावेद शेख यांच्यासोबत गेला होता तो घरी परत आला नाही अशी तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली होती.
दरम्यान २५ जानेवारी या दिवशी सकाळी सात वाजता तळवडी शिवारामध्ये येसवडी कुकडी कॅनॉल मधील पाण्यामध्ये नितीन पोटरे यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता. यानंतर मृतदेहाची ओळख पटली आणि परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










