मुंबई पोलिसांनी उचलले पाऊल
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसच गृहखात्यावर टीका करताना दिसून येत आहेत. गुरुवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे पडसाद पाहायला मिळाले होते. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावर अन् त्यांच्या नरमाईच्या भूमिकेवर नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होत्या.
या सर्व चर्चांना स्वतः उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे.मात्र या सर्व घडामोडींनंतर राज्याचे गृहखाते आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मुंबै बँक फसवणूक प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
प्रविण दरेकर यांना सोमवारी (४ एप्रिल) मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मजूर नसतानाही मजूर संस्थेतून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे २० वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.
त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रविण दरकेर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी दोन आठवड्यांनंतर सुनावणी ठेवली आहे.
मात्र तोपर्यंत न्यायालयाने दरेकर यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. यापूर्वी मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक न करण्याची दरेकर यांची मागणी उच्च न्यायालयाने आधी फेटाळली होती.
त्यानंतर दरेकरांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्जाव जामीन अर्ज फेटाळला आहे. या निर्णयाला दरेकरांनी आता उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.