मुंबई – दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 2-1 ने गमावण्याची किंमत भारतीय संघाला चुकवावी लागली आहे. भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारतीय संघाचे रेटिंग सध्या 116 आहे. भारताने डिसेंबरमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून पहिले स्थान पटकावले होते. यानंतर भरताला सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून कसोटी मालिकेत दमदार सुरुवात केली होती.
माञ जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आणि केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.मालिका विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या क्रमवारीतही दोन स्थानांची सुधारणा झाली आणि संघ 101 च्या रेटिंगसह सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड आणि भारताला मागे टाकून आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. ऍशेस मालिका जिंकण्याचा फायदा कांगारू संघाला मिळाला आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 4-0 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा रेटिंग पॉइंट सध्या 119 आहे.
नवीन कर्णधार पॅट कमिन्ससह ऑस्ट्रेलियाने अॅशेसमध्ये प्रवेश केला. माजी कर्णधार टीम पेनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कर्णधारपद सोडले होते. तथापि, कमिन्स आणि त्याच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आणि ब्रिस्बेन, अॅडलेड, मेलबर्न आणि होबार्टमध्ये इंग्लंडचा पराभव केला. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ 101 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.