मुंबई – उद्यापासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील तब्बल पाच खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात कोण करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रश्नाचा उत्तर स्वतः रोहित शर्माने दिला आहे तो पत्रकारांशी बोलत होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात इशान किशन भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करणार आहे. खुद्द रोहितने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
त्याने असेही सांगितले की संघातील दुसरा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल अजूनही क्वारंटाईनमध्ये आहे आणि तो संघात सामील होऊ शकला नाही. तर शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे.
संघाचा उपकर्णधार लोकेश राहुल सध्या बहिणीच्या लग्नात व्यस्त आहे. त्यामुळे राहुल पहिल्या वनडेत उपलब्ध होणार नाही. दुसऱ्या वनडेपूर्वी तो भारतीय संघात सामील होईल. अशा परिस्थितीत टी-20 संघात समाविष्ट असलेल्या इशान किशनला पहिल्या वनडेत खेळण्याची संधी मिळणार आहे.
रोहितने पत्रकार परिषदेत सांगितले की इशान किशन हाच एकमेव पर्याय असल्याने त्याच्यासोबत डावाची सुरुवात करेल. मयंक संघाचा भाग आहे, परंतु तो संघात उशिरा सामील झाला आणि नियमांनुसार, प्रत्येक खेळाडूने प्रवास केल्यानंतर किमान तीन दिवस क्वारंटाईनमध्ये राहणे आवश्यक आहे. अशा स्थितीत ईशान डावाची सुरुवात करेल. आजच्या सराव सत्रात कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही तर संघाला कोणतीही अडचण नाही, असेही रोहितने सांगितले.
भारताचे प्लेइंग-11 काय असू शकते?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे पाच खेळाडू उपलब्ध नसतील. चार खेळाडू कोरोनाच्या विळख्यात असून लोकेश राहुल बहिणीच्या लग्नात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत रोहित आणि इशान किशन डावाची सुरुवात करतील, तर विराट तिसऱ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळतील. पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंत आणि सहाव्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जाऊ शकते. शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर 7 आणि 8 व्या क्रमांकावर खेळू शकतात. यानंतर युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो.