मुंबई – तो १९४८-४९ सालचा काळ होता. तेव्हा आतासारखे रेकॉर्डिंग स्टुडिओ नव्हते. गाणं रेकॉर्ड करण्यासाठी त्याकाळी रिकामा स्टुडिओ शोधला जायचा किंवा झाडांच्या मागे एखाद्या शांत ठिकाणी किंवा एखाद्या ट्रकमध्ये रेकॉर्डिंगची व्यवस्था केली जायची. अशा काळात ‘महल’ चित्रपटासाठी रेकॉर्ड झालेल्या ‘आएगा आने वाला… आएगा’ या गाण्याची आठवण खुद्द लतादीदींनी सांगितली होती. तेव्हा ‘लाहौर या चित्रपटाचं शूटिंग बॉम्बे टॉकीजमध्ये सुरू होतं. तिथे त्या काळातील लोकप्रिय गायिका-अभिनेत्री जद्दनबाई आणि नर्गिस दोघीही उपस्थित होत्या. लतादीदींनी गाणं रेकॉर्ड करायला सुरुवात केली. जद्दनबाई लक्षपूर्वक गाणं ऐकत होत्या.
गाणं संपल्यावर त्यांनी लतादीदींना जवळ बोलावलं आणि म्हणाल्या, ‘बेटा, इकडे ये, नाव काय आहे तुझं…’ त्यावर दीदी उत्तरल्या, ‘…जी लता मंगेशकर ‘अच्छा, तू मराठी आहेस न?’
‘हो’ त्यावर जद्दनबाई खूश झाल्या आणि म्हणाल्या, ‘माशाअल्लाह… बगैर काय जबरदस्त म्हटलयस… दीपक बगैर कैसे परवाने जल रहे हैं… यातला बग़ैरचा उच्चार ऐकून मी थक्कच झालेय… असं उच्चारण प्रत्येकाचंच असत नाही बेटा…. तू निश्चितच नाव कमावशील…”
जद्दनबाईच्या या कौतुकानं लतादीदी सुखावल्या, पण त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं की, इतके दिग्गज कलाकार एकेका शब्दाचाही किती बारकाईने विचार करतात…












