जिल्‍ह्यातील कोविड परिस्थितीचा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा

384

अहमदनगर – जिल्‍ह्यातील कोविड-19 संदर्भात सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय आयोजित बैठकीत आढावा घेतला. जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाच्‍या वतीने कोविड-19 उपाययोजनांसदर्भात आज बैठक घेण्‍यात आली.

या बैठकीला जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष राजश्री घुले, आमदार आशुतोष काळे, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष राजेंद्र क्षीरसागर, जिल्‍हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्‍त शंकर गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. संजय घोगरे, निवासी उपजिल्‍हाधिकारी संदिप निचित व इतर विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ यावेळी म्‍हणाले जिल्‍ह्यात कोविड रुग्‍ण बरे होण्‍याचे प्रमाण 98 टक्‍के असून जिल्‍ह्यातील 98 गावांमध्‍ये कोरोनाचा एकही रुग्‍ण नाही. गेल्या आठवड्यातील रुग्‍ण बाधीतांचे प्रमाण 1.53 टक्‍के असून जिल्‍ह्यात सध्‍या 626 सक्रीय रुग्‍ण आहेत. कोरोना लसीकरणामध्‍ये 18 वर्षावरील व्‍यक्‍तींचे पहिला डोस घेणा-यांचे प्रमाण 84 टक्‍के असून दुसरा डोस घेणा-यांचे प्रमाण 61 टक्‍के इतके आहे. तर 15 ते 17 या वयोगटातील 72 टक्‍के युवकांनी पहिला डोस घेतला असून 41 टक्‍के युवकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोविड-19 या आजारामुळे निधन पावलेल्‍या रुग्‍णांच्‍या नातेवाईकांचे 15 हजार 336 ऑनलाईन अर्ज प्राप्‍त झाले असून या अर्जांपैकी 10 हजार 401 अर्जांना साणूग्रह अनूदानासाठी मंजुरी देण्‍यात आली आहे. यासाठी 45 कोटी रुपये रक्‍कम मंजुर करण्‍यात आली आहे. अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली.

जिल्‍ह्यात सद्यपरिस्थितीत दररोज 6 हजार कोरोना चाचण्‍या होत असून या चाचण्‍या हळूहळू कमी करण्‍याच्‍या सूचना आरोग्‍य यंत्रणेला देण्‍यात आल्‍या आहेत. जिल्‍ह्यात औषध साठा, ऑक्सिजनची उपलब्‍धता पुरेशा प्रमाणात आहे, असे त्‍यांनी सांगितले. जिल्‍ह्यात गेल्‍यावर्षी नै‍सर्गिक आपत्‍तीमुळे नुकसान झालेल्‍या बाधित व्‍यक्‍तींना 100 टक्‍के आर्थिक मदत देण्‍यात आलेली आहे. महानगरपालिका हद्दीतील मुख्‍य रस्‍ते दुरूस्‍तीसाठी जिल्‍हा वार्षिक योजनेतून महानगरपालिकेला 15 कोटी रुपये देण्‍यात येणार असून या निधीच्‍या माध्‍यमातून शहरातील मोठे व जास्‍त रहदारीचे रस्‍ते दुरूस्‍त करण्‍यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्‍या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्‍णालयाला नुतणीकरणासाठी 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्‍यात आला आहे, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्‍ह्यातील कायदा व सुव्‍यवस्‍थाबाबतही आढावा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here