अहमदनगर – घरामध्ये अचानक लागलेल्या आगीत एका महिलेचा भाजून मृत्यू झाला आहे. वैशाली विठ्ठल नन्नवरे (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. बालिकाश्रम रोड परिसरातील महावीरनगरमध्ये सोमवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नसून तोफखाना पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
महावीरनगर भागामधील एका घरातून सोमवारी सकाळी अकराच्या सुमाराला धूर येऊ लागला. नेमका धूर कशाचा आहे, याची माहिती आजूबाजूच्या लोकांना कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला त्याची माहिती दिली. अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ हे अग्निशमन दलाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही मिनिटांत आग आटोक्यात आणली. दरम्यान या आगीत भाजलेल्या वैशाली नन्नवरे यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी या पथकासह दाखल झाल्या. त्यांनी घटनेची माहिती घेतली असून नेमकी आग कशामुळे लागली, किंवा हा अन्य काही प्रकार आहे का? याचा शोध पोलीस घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.











