जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग प्रकरणी निलंबित झालेले तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांच्याभोवती कारवाईचा फास : कोणत्याही क्षणी अटक?

*डॉ. पोखरणा कोणत्याही क्षणी अटक?; कारवाईचा फास आवळला*

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी निलंबित झालेले तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांच्याभोवती कारवाईचा फास आवळला जात आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात मोठ्या प्रमाणात पुरावे पोलिसांना सापडले आहेत. त्यामुळे पोखरणा यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

*न्यायालयात करणार हजर*

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात आज सायंकाळी चार जणांना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका यांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

*मोठ्या प्रमाणात पुरावे*

दरम्यान, याप्रकरणी कुठल्याही क्षणी डॉ.सुनिल पोखरणा व डॉ.सुरेश ढाकणे यांना अटक होऊ शकते. सुत्रांच्या माहितीनुसार याप्रकरणात मोठ्या प्रमाणात पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज व महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे. पोलिस महानिरीक्षक दिपक पाण्डेय, नाशिक विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर हे नगर येथील पोलिस अधीक्षक मनोज पाटील, या प्रकरणाचे तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या संपर्कात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊनच आज पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. *वैद्यकीय क्षेत्रात खळबळ*यामध्ये तीन परिचारिकांचा समावेश असल्यामुळे परिचारिकांची संघटना आक्रमक झाली आहे. घटनेतील मुख्य सूत्रधाराला पाठिशी घालण्यासाठी परिचारिकांना अटक केल्याचे त्यांचे मत आहे. तसेच संघटनेकडून या परिचारिकांच्या बाजूने न्यायालयात वकील दिला जाणार आहे. दरम्यान, सायंकाळी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या नातेवाईकांचा तोफखाना पोलिस ठाण्यात आक्रोश सुरू होता. अटकेची कारवाई झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here