श्रीगोंदा – काष्टी येथील मित्राला कार मधून सोडविण्यासाठी जात असताना ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही दुर्देवी घटना रविवार दि.१३ रोजी रात्री एक च्या सुमारास श्रीगोंदा-काष्टी रस्त्यावर हाॅटेल अनन्या समोर घडली . या अपघातात राहुल सुरेश आळेकर (वय-२२ वर्षे) रा.श्रीगोंदा, केशव सायकर (वय-२२ वर्षे) रा. काष्टी व आकाश रावसाहेब खेतमाळीस वय (१८ वर्षे) रा. श्रीगोंदा या तिन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आकाश व राहुल हे केशव सायकरला सोडविण्यासाठी काष्टीला जात असताना अपघात झाला. तिन्ही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात हळहळ व्यक्त आहे.
ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर बनले मृत्यूचे सापळे
सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चारही कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम जोरात सुरू आहे. आरटीओ परवानगी नसतानाही ऊस वाहतुकदार एका ट्रॅक्टरला दोन-दोन ट्रॉल्या जोडून वाहतूक केली जाते. विशेष म्हणजे ट्रॅक्टर चालक टेपरेकॉर्डरचा मोठा आवाज करून चालतात. ट्रॉलीला पाठीमागून रिफ्लेक्टर लावले जात नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी पाठीमागून आलेल्या वाहनाला अंदाज येत नाही. परिणामी सतत अपघात होऊन सामान्य नागरिकांचा बळी जात आहे.
नातवाचा अपघाती निधन झाल्याने धक्का बसून आजोबांचे निधन
शहरातील राहुल आळेकर या युवकाचे रात्री अपघाती निधन झाले त्याच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मयत राहुल याचे आजोबा(आईचे वडील) जालिंदर लहानू शिंदे (वय ६३ वर्षे) रा. घारगाव हे आज सकाळी अंत्यविधीसाठी आले असता त्यांना नातवाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्यांना शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु त्यांचा मृत्यू झाला.