के के रेंजसाठी नवीन भूसंपादन होणार नसल्याची संरक्षणमंत्र्यांची ग्वाही
२३ गावातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा; आ.निलेश लंके यांची माहिती
नगर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे आ. निलेश लंके यांच्यात दिल्ली येथे झालेली बैठक यशस्वी झाली असून, पारनेर, नगर व राहुरी या तीन तालुक्यातील २३ गावांमध्ये प्रस्तावित के. के. रेंजसाठी होणारे नवीन भूसंपादन करण्यात येणार नाही, अशी ग्वाही राजनाथ सिंग यांनी दिल्याची माहिती आ. निलेश लंके यांनी दिली.
दिल्ली येथे झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे, पंचायत समिती सभापती अण्णा सोडणर, वनकुटेचे सरपंच राहुल झावरे यांच्यासह संरक्षण विभागाचे सचिव, अधिकारी यांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये शरद पवार यांनी नव्याने संपादन करण्यास विरोध केला. भूसंपादन झाल्यास ह्या भागातील शेतकरी विस्थापित होतील तसेच मुळा धरण, कृषी विद्यापीठ झाल्यामुळे लोकांचे पहिलेच विस्थापन झाले आहे. मुळा धरण असल्यामुळे हा भाग बागायती झालेला आहे. ह्या भागातील प्रमुख पीक डाळिंब, ऊस असून त्यामुळे स्थलांतर शक्य नाही. तसेच गायी, शेळ्या, मेंढ्या आहेत, असे पवार यांनी संरक्षणमंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिले.
आ.लंके यांनी या भागात आदिवासी लोकांची संख्या ६० टक्के असून हे बरेच लोक वनविभागाच्या हद्दीत राहतात. त्यांचे उपजीविकेचे साधन शेतीवर अवलंबून आहे, असे निदर्शनास आणून दिले. त्यावर यापुढे कोणताही निर्णय घेत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी, संरक्षण अधिकारी व ग्रामस्थ यांमध्ये सर्व प्रथम बैठक होईल, अशी ग्वाही संरक्षणमंत्री यांनी दिली. ही बैठक सुमारे पन्नास मिनिटे चालली.