पारनेर:
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर पारनेर पोलीस ठाण्यातही आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार शनिवारी 14 तारखेला सोशल मीडियावर केतकी चितळे हिने एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती.
एका कवितेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान तिने लिहिले होते. चितळेची पोस्ट मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाली मात्र त्यानंतर सोबतच तिची पोस्ट शेअर करून तिला एक प्रकारे या लोकांनी प्रसिद्धी दिली म्हणून तिच्या विरोधात आपण फिर्याद देत आहे, असे संजीव भोर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे पोलिसांच्या पोलीस कोठडीत असलेली आरोपी केतकी चितळे हिला जामीन मंजूर होण्याच्या आधीच पारनेर पोलिसांनी ताब्यात घ्यावे अशी मागणी संजीव भोर यांनी केली आहे.