अहमदनगर – भिंगार पोलीस स्टेशनच्या ( bhingar camp police station) हद्दीमध्ये कापुरवाडी (ता. नगर) परिसरात धुमाकूळ घालणारा सराईत गुन्हेगार किरण कराळे (रा. कापुरवाडी) याला अटक करण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे.
त्याच्याविरूध्द पाच गुन्हे दाखल असून एका युवकाच्या डोक्यात टणक वस्तू मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा 5 जानेवारी 2022 रोजी दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
आरोपी किरण कराळे हा 5 जानेवारी 2022 रोजी रात्री नऊ वाजता कापुरवाडी शिवारात आदित्य मुठे याच्यासोबत भांडण करत असल्याची माहिती त्यांचा भाऊ मयूर सुखदेव मुठे (वय 22 रा. कापुरवाडी) यांना कळली. मयूर हा त्याच्या दुचाकीवरून रस्त्याने जात असताना रस्त्यावर सराईत गुन्हेगार किरण कराळे याने त्याला अडविले. मयूर सुखदेव मोठे यांच्या डोक्यात काहीतरी टणक वस्तू मारून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घटना घडल्यानंतर किरण कराळे पसार झाला होता. याप्रकरणी मयूर याने भिंगार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून किरण कराळे विरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरण विरोधात आणखी काही गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास भिंगार कॅम्प पोलीस शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ, पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय नगरे,पोलीस नाईक भानुदास खेडकर,पोलीस नाईक राहुल द्वारके,पोलीस नाईक बापूसाहेब मस्के,चालक पोलीस कॉन्स्टेबल भागचंद लगड या पथकाने कारवाई केली .













