अहमदनगर- एमआयआरसी सेंटरच्या बंद असलेल्या फॅमिली क्वॉर्टरमध्ये चोरी करताना एका अल्पवयीन मुलाला पकडले तर त्याचा दुसरा साथीदार पसार झाला आहे. सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास एमआयआरसीच्या फॅमिली क्वार्टरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दोघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभेदार नवनाथ भोसले (वय ४६ रा. सिटी बटालीयन, एमआयआरसी सेंटर, मूळ रा. बार्शी जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी मध्यरात्री दोन अल्पवयीन मुले एमआयआरसी सेंटरच्या बंद असलेल्या फॅमिली क्वार्टरमध्ये घुसले होते. त्यांनी रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून नुकसान केले.
रूममधील प्लॅस्टिकची पट्टी उचकटून त्यातील १८ हजार रुपये किमतीची केबल चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातील एकाला फिर्यादी व त्यांच्या साथीदारांनी पकडले. दुसरा मुलगा पळून गेला. याबाबतची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना देण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार राठोड करीत आहेत.