बारामतीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आता शक्ति अभियान राबविले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अभियानांतर्गत शहरातील विविध भागात शक्ती बॉक्स ठेवले जातील. त्या माध्यमातून नागरिकांना काही तक्रार असेल तर ती या बॉक्समध्ये टाकता येईल. पुढच्या दोन दिवसात पोलीस त्या तक्रारींची दखल घेतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
बारामतीत महाविद्यालयीन तरुणाचा भरदिवसा झालेला खून, तत्पूर्वी घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी गुरुवारी (दि. ३) भल्या सकाळी जिल्हा पोलिस प्रमुखांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, ”शक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यात महिलांचा सन्मान, पालकांची सुरक्षा आणि युवकांचे प्रबोधन केले जाईल. युवकांना सध्या प्रबोधन करण्याची फार गरज आहे. शहरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, खासगी कंपन्या, हॉस्पिटल, एस.टी.स्टॅंण्ड, कोचिंग क्लासेस, महिला वसतिगृह, पोस्ट ऑफिस याठिकाणी पोलिसांमार्फत शक्ती बॉक्स तक्रारपेटी ठेवण्यात येईल. मुली, महिला, युवा तसेच नागरिकांना काही अडचणी असल्यास ते पेटीमध्ये टाकतील. पोलीस त्यावर कार्यवाही करतील. पोलिसांना या माध्यमातून गुन्हे रोखता येतील. शिवाय तक्रारदाराचे नावही गोपनीय ठेवले जाणार आहे. शक्ती अभियानांतर्गत सोशल मिडियाच्या माध्यमातूनही होणाऱ्या गुन्ह्यांवर पोलिसांची नजर असेल. मुलींचा पाठलाग करणे, छेडछाड करणे, फोन करून त्रास देणाऱ्यांवरसुद्धा या अभियानांतर्गत कारवाई होईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह…
शहरात बऱ्याच घटना घडत असतात. सामान्य माणूस याबाबत तक्रार किंवा आवाज उठवायला घाबरतो. त्यासाठीच आपण हे ‘शक्ती अभियान’ तथा ‘शक्तीबॉक्स तक्रारपेटी अभियान’ राबवत आहोत. त्याचबरोबर एक शक्ती क्रमांक उपलब्ध करून दिला जात आहे. ”एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह” असं स्लोगन त्याला दिले आहे. तो क्रमांक ९२०९३९४९१७ असा आहे. या क्रमांकाची सेवा सातही दिवस २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या नंबरवर फोन किंवा मेसेज करुन तक्रार केल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात येणार आहे.












