आम्ही 25 वर्षे नको ती अंडी उबवली” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
बारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सातत्याने आरोप करत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिवाळीनंतर राज्यात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. बारामतीत अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्र्सच्या माध्यमातून कृषी महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटर आणि विज्ञान संशोधन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात राष्ट्पवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली.काय म्हणाले उद्धव ठाकरे?बदल सगळीकडे घडू शकतो हे इथे दिसून आलं. मी मनातल्या मनात विचार करत होतो, राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असतं. आम्हीही उघडलं होतं 25-30 वर्ष. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही बघत आहात. अशा गोष्टी घडत असतात. आपलं काम आपण केलं. पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवायचं असतं. दिवाळी सुरू झालेली आहेच. काही जण म्हणत आहेत की बॉम्ब फोडणार आहेत. काही हरकत नाही फटाके जरूर फोडा पण धूर काढू नका. कोरोना तसा गेलेला नाही हे लक्षात असू द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले.कुटुंब रंगलंय काव्यात नावाचा विसुभाऊ बापट यांचं कार्यक्रम होता. त्याची आठवण मला आज होते आहे पवार कुटुंब रंगलंय विकासात असं मी म्हणेन. सगळं पवार कुटुंब विकासाच्या ध्यासाने काम करतं आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आत्ता मला सुप्रियाने सांगितलं शरद पवारांचं सहस्त्रचंद्र दर्शन होणार आहे. मी म्हटलं की खोटंच सांगते आहेस का कारण इतका तरूण नेता मी पाहिलेला नाही. ज्यांनी विकासाचा सूर्य दाखवला आणि अजूनही थांबायचं नाव घेत नाहीत. शरद पवार महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत. राजकारणात टीकाकार असतात, असलेच पाहिजेत, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ‘आम्हीही इतकी वर्ष तुमचे टीकाकार होतोच. शिवसेना प्रमुख आणि पवार साहेबांची मैत्री जगजाहीर आहे. ते मला म्हणायचे की बारामतीत जाऊन एकदा ते शरद बाबू काय करतायत ते पाहायला हवं. पाठिंबा जरी देता येत नसला, तरी त्यात विघ्न आणू नये. विघ्नसंतोषी खूप आहेत. पण या कामातून जो आनंद मिळतो, तो त्या विघ्नसंतोषींना कधीच मिळणार नाही’ असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.