मळणीयंत्रात अडकून विवाहितेचा मृत्यू!
राहुरी तालुक्यातल्या शेरी चिखलठाण येथे रविवारी दुपारी मळणी यंत्रात अडकून विवाहित तरूणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, उपचार सुरु असताना रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. विजया वैभव काकडे (वय २४) असे मृत पावलेल्या विवाहीत तरूणीचे नाव आहे.
विजया काकडे ही आपल्या शेतातील बाजरीचे दाणे इतरांच्या मदतीने ट्रकरच्या साह्याने चालणाऱ्या मळणी यंत्राद्वारे काढत होती. चाळणीवर साचलेले काड काढण्यासाठी गेली असता डोक्याला बांधलेले ‘स्कार्फ’ ट्रक्टरने मळणी यंत्राला जोडलेल्या शॉफ्टमध्ये गुंडाळले गेले.
त्यामुळे ती गती असलेल्या शॉफ्टमध्ये अडकली. मशीनला असलेल्या वेगवान गतीमुळे शॉफ्टबरोबर तीही वेगवान गतीने फिरून जमीनीवर जोरदार आदळली. यामुळे तिच्या डोक्याला गंभीर इजा होऊन तिच्या हातापायाला जबर मार लागला. या गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयामध्ये हलवले.
त्याठिकाणी तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असताना मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या मागे एक ३ वर्षांची आणि एक ११ महिन्यांची अशा दोन मुली आहेत. दरम्यान, या विवाहितेच्या अकाली झालेल्या मृत्युमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे