पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवापालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

655

अकोला,दि.५ – शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जा ये करणे सोपे व्हावे, तेथील मालाची, खते बियाणे, अवजारे यंत्रे यांची वाहतुक करणे सोपे व्हावे यासाठी शेतापर्यंत जाणारे पाणंद रस्ते तयार करणे आवश्यक असून जिल्ह्यात पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी , असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली पाणंद रस्ते तयार करण्याच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना. कडू यांनी निर्देश दिले की, पाणंद रस्त्यांच्या विकासाचे जाळे जिल्ह्यात निर्माण करणे आवश्यक आहे. पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी जिल्ह्यात गाव समित्यांच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करा. रस्त्यांच्या आवश्यकतेनुसार वर्गीकरण करुन प्राधान्यक्रम ठरवा. या रस्त्यांसाठी लागणारे खडी मुरुम आदी गौणखनिज उपलब्धतेसाठी एकाच जागेची निवड करुन उत्खननानंतर त्या जागेवर जलसंधारण उपचार करावे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी स्तरावर बैठकांचे आयोजन करुन प्रस्ताव तयार करावे,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.तसेच जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी असलेली १०२ गावे निवडून त्यात पाणंद रस्ते विकासासोबत इ- क्लास जमिनीची माहिती, गावात वृक्ष लागवड, गावतलाव विकास, ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम, गावातील नाल्यांचे खोलीकरण रुंदीकरण, बाजार ओटे तयार करणे, व्यायामशाळा, वाचनालय, सभागृह इ. सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here