
नगर : बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ (Zimma 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. आता ‘झिम्मा २’ या चित्रपटात आपल्या लाडक्या आर्चीची म्हणजे रिंकू राजगुरुची (Rinku Rajguru) एन्ट्री झाली आहे. ‘झिम्मा २’ मधील ती साकारणाऱ्या पात्राचं नाव आता समोर आलं आहे.
रिंकू राजगुरुने यासंदर्भात नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यात रिंकू राजगुरु ही ड्रेस परिधान करुन पर्स घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. यावर ‘झिम्मा २’ असे लिहिले आहे. “सांगता येत नाही ते करायचंच कशाला ? सरळ पण प्रेम… झिम्मा २ ची नवी खेळाडू! सुनबाई… तानिया! ‘झिम्मा २’, २४ नोव्हेंबर पासून तुमचे आमचे REUNION चित्रपटगृहात…”, असे कॅप्शन रिंकू राजगुरुने दिले आहे.
या पोस्टवरून ‘झिम्मा २’ या चित्रपटात रिंकू राजगुरुच्या पात्राचे नाव तानिया आहे असं तर स्पष्ट झालं आहे. यात ती निर्मिती सांवत यांची सूनबाई असल्याचे पात्र साकारत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये तिची झलकही पाहायला मिळाली आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर झळकणार आहेत. चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.




