UP Election Result : समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी 61 हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून, करहलमधून (Karhal) हा विजय मिळवला असून भाजपचे केंद्रीय मंत्री असलेल्या एसपी सिंह बघेल यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलेलं होतं.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करायचा या उद्देशाने भाजपने कंबर कसली होती. त्यामुळेच त्यांनी करहल मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांना उमेदवारी दिली होती. पण सुरुवातीपासूनच अखिलेश यादव आघाडीवर राहिले. भाजपला शेवटपर्यंत ही आघाडी मोडता आली नाही. आता अखिलेश यादव 61 हजार मतांनी विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा ‘योगी राज’उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. आतापर्यंत भाजप 270 ठिकाणी आघाडीवर तर समाजवादी पक्षाला 128 जागांवर समाधान मानावं लागलंय. बसपा तिसऱ्या स्थानी तर काँग्रेस चौथ्या स्थानी पोहोचलं आहे. गेल्या वेळच्या तुलनेत या वेळी भाजपच्या जागा जरी घटल्या असल्या तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सत्ता राखली आहे.
निवडणूक प्रचार रॅलीमध्ये अखिलेश यादव यांनी पूर्ण आत्मविश्वासाने दावा केला की, सपा पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन करणार. सुरुवातीला त्यांनी 400 पारचा नाराही दिला होता. मात्र नंतर त्यांनी 300 पारचा नारा दिला. अखिलेश यादव यांच्या सभांमध्ये मोठी गर्दी होत होती. सपाचा जाहीरनामाही खूप चर्चेत होता. भाजप आणि मुख्यमंत्री योगी यांच्यावर निशाणा साधण्यातही त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. आता त्यांचे सर्व दावे फोल ठरताना दिसत आहेत. मात्र सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी करहल मतदारसंघातून मोठी आघाडी कायम ठेवली आहे.




