UP Election 2022 : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अशातच उत्तर प्रदेशकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपसाठी उत्तर प्रदेशची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. आज भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 91 उमेदवारांची यादी जारी केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मीडिया सल्लागार शलभमणि त्रिपाठी यांना देवरिया येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांना अलाहाबाद पश्चिम येथून तिकिट देण्यात आले आहे. या शिवाय अयोध्येतून वेद प्रकाश गुप्ता, अलाबाबाद दक्षिण येथून नंद कुमार गुप्ता यांना तिकिट देण्यात आले आहे.
शलभमणि त्रिपाठी पत्रकार होते. 2016 साली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्रिपाठी यांनी प्रदेश प्रवक्ता पदाची जबाबादारी स्विकारली. भाजपने उमेदवारांची नावे ट्वीट करत जाहीर केली आहे. भाजपने ट्विटरवर लिहिले आहे की, भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने पाचव्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या अगोदर भाजपने 206 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
मंत्री सुरेश पासी यांना जगदीशपूर, सिंधुजा मिश्रा यांना कुंडा येथून उमेदवारी दिली आहे. तर मंत्री राजेंद्र प्रताप सिंह मोती यांना पट्टी विधानसभा, मंत्री गोपाल नंदी यांना अलाहाबाद दक्षिण, माजी मंत्री अनुपमा जयसवाल यांना बहराइच आणि मंत्री रमापती शास्त्री यांना मनकापूर येथून उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय मंत्री जय प्रताप सिंग यांना बंसी, सतीश द्विदी यांना इटवा, जयप्रकाश निषाद यांना रुद्रपूर, मंत्री सूर्य प्रताप शाही यांना पथरदेवा आणि उपेंद्र तिवारी यांना फेंकना येथून उमेदवारी जाहीर केली आहे.







