
Thief : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथे सुद्रीकेश्वर महाराज मंदिरातील (Sudrikeshwar Maharaj Temple) चांदीचे ३० किलो वजनाचे प्रभावळ चोरीस गेले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV camera) कैद झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेने आज मंदिरातील तीन चोरांना (Thief) चांदीच्या प्रभावळीसह ताब्यात घेतले. भास्कर खेमा पथवे (रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर), राजेंद्र ठकाजी उघडे (वय ३०, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) व भाऊराव मुरलीधर उघडे (वय ३६, रा. विटा, ता. अकोले) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.
चोर पकडण्याच्या मागणीसाठी होते गाव बंद (Thief)
सुद्रीकेश्वर महाराज मंदिरात सोमवारी (ता. १२) रात्री २४ लाख रुपये किमतीचे चांदीचे ३० किलो प्रभावळ चोरी गेले होते. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. परिसरातील नागरिकांनी चोर पकडण्याच्या मागणीसाठी गाव बंद ठेवले होते. घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला य़ांनी या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता.
पथकाने डोंगरात दोन दिवस केला मुक्काम (Thief)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, ही चोरी नांदुरी दुमाला येथील भास्कर पथवेने केली आहे. त्यानुसार पथक नांदुरी दुमाला येथे पोहोचले. मात्र, भास्कर पथवे हा डोंगरावर राहतो व त्याच्या घराकडे जाण्यासाठी एकच रस्ता आहे. त्याला उंचावरून कोणी येत असल्याची त्यामुळे सहज चाहूल लागते. त्यामुळे तो सापडत नाही, असे पथकाला कळाले. त्यानुसार पथकाने डोंगर पायी चढला. डोंगरात दोन दिवस मुक्काम केला. भास्करच्या घराला चारी बाजूंनी घेराव करून सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा राजेंद्र उघडे व भाऊराव उघडे यांच्या मदतीने केल्याची कबुली पथकाला दिली. त्यानुसार पथकाने राजेंद्र व भाऊराव यांनाही ताब्यात घेतले. जेरबंद आरोपींकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यातील भास्कर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी १६ तर राजेंद्र उघडेवर एक गुन्हा दाखल आहे. पथकाने पुढील तपासासाठी जेरबंद आरोपींना श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.




